Photo Gallery

Netwani

स्वच्छ् भारत् सर्वेक्षण टीम् गेली पुन्हा जैसे थे..... नुकताच स्वच्छ् सर्वेक्षणासाठी सर्वे झाला. ज्या ज्या ठिकाणी लोक घाण करतात ती जागा स्वच्छ करुन त्या ठिकाणी रक्षक बसवण्यात आले होते. आता सर्वेची टीम गेली. रक्षकही गेले. पुन्हा सार्वजनिक ठिकाणाचे भक्षण सुरु झाले!

Netwani

पाम वृक्षांना झालंय काय? वाळू का लागली...... सुशोभित लातूर अभियानात लातूर शहरातील दुभाजक, चौक सजवण्यात आले. दयानंद महाविद्यालयासमोरील या दुभाजकात पामची झाडे लावण्यात आली होती. ही झाडे दिवसागणिक वाळू लागली आहेत. लावणारे आणि बघणारे सगळेच काळजीत पडले आहेत.

Netwani

गुड न्यूज....हा रस्ता लातुरचाच आहे छायचित्रात पाहताय तो रस्ता लातुरचाच आहे. मिनी मार्केट ते राजस्थान शाळा या अंतरात तीन दिवसात अती वेगाने हा रस्ता तयार करण्यात आला. या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मंत्री चंद्रकांत पाटील यांना कुणीतरी याचा फोटो पाठवायला हवा!

Netwani

मनात कायम स्मृती कोरुन जाणारे दोन महाराष्ट्राचे कर्तबगार सरदार.....

Netwani

असा सिल्व्हर मॅन पाहिलाय का? महाराष्ट्रात भरपूर गोल्डमॅन आहेत. एकाचा तर आख्खा सदराच सोन्याचा होता. आपल्या लातुरातही गोल्डमॅन आहे. पण सिल्व्हरमॅन सहसा दिसत नाही. रंगपंचमीच्या दिवशी सावेवाडी परिसरात हा सिल्व्हरमॅन सापडला. आता याचं अंग पाण्यानं मुळीच स्वच्छ होणार नाही. दीड दोन लीटर रॉकेल किंवा पेट्रोलला शहीद व्हावंच लागणार आहे.

Netwani

तळपत्या उन्हात जोडीनं मॉर्निंग वॉक..... मॉर्निंग वॉक करायला वेळेचं बंधन नसतं. नाना नानी पार्कसारखे वॉकींग ट्रॅक कायम खुले असतात. त्यातल्या त्यात जोडीने केलेला मॉर्निंग वॉक अधिक सुखदायी असतो. आज दुपारी भर दुपारी एक वाजता तळपत्या उन्हात चालू असलेला हा वॉक!

Netwani

चला स्टेडियममध्ये रस प्यायला! सकाळी सकाळी लातुरच्या क्रीडा संकुलाच्या बाहेर आवळा, कोरफड असे वेगवेगळे रस विकत मिळायचे. आता ऊसाचे दिवस आहेत. सगळीकडे रसवंत्या बहरल्या आहेत. अशीच रसवंती क्रीडा संकुलावरही पहायला मिळते. पण ती गेटबाहेर नाही. तर गेटच्या खूप आत. संकुलातील डिव्हायडरवर व्यायाम करुन थकून बसलेल्यांन रोज रस गाळून मिळतो. रसवंत्यांच्या भांडणात परावा एकाच्या पायाला इजाही झाली होती.

Netwani

पवारांच्या मागे लपले मावळे! शहर सुशोभिकरणाच्या मोहिमेत अनेक चौक सजवले जात आहेत. तसाच शिवाजी चौकही सजवण्यात आला. या चौकात एके ठिकाणी तोफेशेजारी दोन मावळे उभे आहेत असा देखावा तयार करण्यात आला आहे. अशोक हॉटेलकडून येणार्‍यांना मावळे दिसत नाहीत. शरद पवार यांचं होर्डींग दिसतं. एमआयडीसीकडून येणार्‍यांना मावळे दिसतात. चौक सुशोभित झाले पण चौकात पोस्टर्स कुठे लावू नयेत हेही ठरले पाहिजे.

Netwani

खरा बॅंड अंबॅसिडर...... स्वच्छता मोहिमेच्या पोस्टरवर जीवनधर शहरकर गुरुजींचे छायाचित्र दिसले. एक जिद्दी, अभ्यासू, चिकाटीचे पत्रकार, राजस्थान शाळेचे शिक्षक आणि लढवय्ये स्वतंत्रता सेनानी म्हणून त्यांची ख्याती आहे. सध्या स्वच्छ सर्वेक्षण सुरु आहे. त्याच्या पोस्टरवर गुरुजी दिसल्याने खरा बॅंड अंबॅसिडर लातुरला मिळाला आहे असे वाटले.

Netwani

सू....सू....करणार्‍यावर नजर, स्वच्छ सर्वेक्षणाच्या बक्षिसासाठी हो‌ऽऽऽऽऽ लातूर शहराचं स्वच्छ सर्वेक्षण चालू आहे. या सर्वेक्षणात बक्षीस मिळावं या साठी आटोकाट प्रयत्न केले जात आहे. उड्डाण पुलाखाली असाच एक अड्डा आहे. या अड्ड्यावर बिनधास्तपणे कचरा टाकला जातो. छोट मोठे विधी उरकले जातात. अंधाराचा तर भलताच फायदा घेतला जातो. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वे चालू असल्याने अशा जागांवर माणूस नेमून पाळत ठेवली जात आहे.

Netwani

काळी पिवळीला प्रतिष्ठा...लक्झरी स्टॉप! एसटी सगळ्या प्रवाशांना न्याय देऊ शकत नाही. राहिलेली पोकळी काळी पिवळी आणि मिनी बसेस भरुन काढतात. या खाजगी वाहनांचा इतिहास आपण जाणतो. ही खाजगी वाहने शहराबाहेरच लावा. त्यांचा व्यवहार आणि वावर शहरात नको असा आदेश या आधीच्या जिल्हाधिकार्‍यांनी काढला होता. तो काही काळ पाळलाही गेला पण आता औसा मार्गावरील क्रीडा संकुलाच्या समोर या काळया पिवळ्या गाड्यांनी आपला थांबा तयार केला आहे.

Netwani

कार्यकर्त्यांनी ठेवली आठवण....... आजलातूर, नेटवाणी आणि संवाद एसएमएस वृत्तसेवेचे संपादक रवींद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करताना स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर आणि युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते सूरज राजे, जफर नाना, कुणाल शृंगारे,कुणाल वागज,अजय वाघदरे,जफ़र सय्यद, जय ढगे, राम गोरड, गौस मणियार, महेश ढोबळे, अँड. किशन शिंदे, अमर देवकते, अभिजीत साबणे, मुरारी पारीख, मनोज नरके.

Netwani

टिळक चौकात जाते इज्जत....... लातूर शहरातील अशोक हॉटेल चौक म्हणजे आताचा लोकमान्य टिळक चौक. या चौकात जुने विश्रामगृह आहे. ते बंद आहे. या जागेवर बीओटी तत्वावर व्यापारी संकुल बांधले जाणार आहे अशी चर्चा आहे. शिवाय वकील मंडळाने ही जागा न्यायालयाच्या विस्तारीत कक्षासाठी मागितली. कुणाला मिळायची त्याला मिळो पण ही जागा नीट ठेवणं आवश्यक आहे. या जागेच्या चौकातल्या कंपाऊंडचा कोपरा जमीनदोस्त झाला आहे. या जागेत शिरण्याचा मार्गच मिळाला आहे. त्यामुळे त्याचा गैरवापरही होत आहे. शिवाय हा पडलेला भाग अतिशय अशोभनीय आहे. पडलेले कंपाउंड बांधून घेतल्यास नक्की इज्जत वाचेल.

Netwani

मनपाच्या उरावर आसारामबापू!...... १४ तारखेला व्हॅलेंटाईन डे झाला. याला अनेक स्तरातून विरोध आहे. तसाच आसारामबापूंचाही आहे. या दिवशी माता पिता दिन पाळावा, त्यांचे पूजन करावे असे आवाहन ते करतात. आता तरुण मुलांना हे किती आवडलं कितीजण माता पिता पूजनाला गेले हे माहित नाही पण या दिनाचं आवाहन करणारं पोस्टर बापूंच्या अनुयायांनी गांधी चौकात लावलं. सध्या स्वच्छतेचा सिझन चालू आहे. स्वच्छतेचं आवाहन करणारं एक पोस्टर महानगरपालिकेनं गांधी चौकात लावलं होतं. त्या पोस्टरवर बापुंच्या अनुयायांनी अतिक्रमण केलं. मनपाच्या पोस्टरवर आपलं पोस्टर लावलं. या चौकातून जाणारा एकजण थांबला, त्यानं ते बघितलं अन तो म्हणाला, पोस्टर लावणार्‍याच्या माता पित्यांना सलाम!